हे एक द्विदल वनस्पतींचे कुल आहे. ह्या कुलातील वनस्पतींची पाने मांसल व रसाळ असतात. फ़ुले नियमित आकाराची असतात. प्रत्येक केसरमंडलात संख्येने सारखेच केसर असतात. जितकी प्रदले, तितकीच मोकळी किंजपुटे असतात. प्रत्येक किजमंडलांत शल्कासारखे प्रपिण्ड असतात. फळे पेटिकासम असतात. ह्या कुळातील जाती सर्व जगभर आढळतात, परंतु प्रामुख्याने उत्तर गोलार्धात व दक्षिण आफ्रिकेत. ह्या वनस्पती बहुधा शुष्क व/ किंवा थंड, जिथे पाण्याची कमतरता असते अशा परिसरात आढळतात. यांतील कोणतीही जात हे महत्त्वाचे पीक नाही. परंतु अनेकांची लागवड शोभिवंत वनस्पती म्हणून केली जाते. ह्यातील दोन सुपरिचित जाती म्हणजे घायमारी/पानफ़ुटी, किंवा जख्मेहयात (Bryophyllum calycinum Salib. दुसरे नाव :.Kalanchoe Pinnutum Kurz) आणि हेमसागर (Kalanchoe Iaciniata D.C.). पानफ़ुटी ही फार व्रणशोधक, व्रणरोपक,व रक्तवर्धक अशी औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डोगरात व बागांत आढळते. हेमसागर ही संग्राहक व रक्त्तस्कंदक औषधी आहे. ही महाराष्ट्रातील कोकण, माथेरान, महाबळेश्वर येथे, आणि कर्नाटकातील धारवाड येथे आढळते.